पिकांचे उत्पन्न वाढीसाठी जैविक खतांचा वापर

पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या निर्जंतुक वाहकामध्ये केलेल्या मिश्रणास जैविक खत असे म्हणतात.

जैविक खतांचे प्रकार

) नत्र स्थिर करणारे जैविक खत

) रायझोबियम :

रायझोबियम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून हवेतील नत्र सहजीवी पद्धतीने स्थिर करून पिकांना उपलब्ध करून देते. साधारणतः रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी ५० ते १५० किलो नत्र स्थिर करतात. रायझोबियम जैविक खत तुर, मुग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग ई. द्वीदल पिकांसाठी उपयुक्त ठरते.

) ॲझोटोबॅक्टर :

ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू असहजिवी पद्धतीने हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात जमिनीत स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, मका, कापूस, फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते. साधारणतः हे जिवाणू प्रति हेक्टरी १५-२० किलो नत्र स्थिर करतात.

)ॲझोस्पीरीलम :

ॲझोस्पीरीलम हे जिवाणू असहजीवी पद्धतीने हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात जमिनीत स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे की मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पीरीलम जिवाणूंची शिफारस केली जाते. हे जिवाणू प्रति हेक्टरी २०-४० किलो नत्र स्थिर करतात.

) ॲसिटोबॅक्टर :

हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत. हे जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये आणि पिकांमध्ये राहून हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटे, ई. पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३०-३०० किलो नत्र स्थिर करतात.

) स्फुरद विरघळणारी जैविक खते :

स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये स्फुरदची उपलब्धता कमी असल्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते, परंतु त्यापैकी अल्प स्फुरद पिकांना उपलब्ध होते. बहुतांश स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिक घेऊ शकत नाही. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च वाया जातो. त्यामुळे जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम हे जिवाणू करतात. आणि हे जिवाणू प्रति हेक्टरी १५-२० किलो स्फुरद विरघळवतात.

) पलाश उपलब्ध करून देणारी जैविक खते :

पलाश हे पिकासाठी आवश्यक असलेलं अन्नद्रव्य महाराष्ट्रातील जमिनींमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. परंतू त्यांपैकी बहुतेक पलाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. तेच जमिनीत स्थिर झालेले पलाश पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे पलाश उपलब्ध करून देणारे जिवाणू करतात.

) झिंक विरघळविनारी जैविक खते:

झिंक हे पिकांसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये झिंकची कमतरता आढळते. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट येते. जमिनीत स्थिरावलेले झिंक विरघळवण्याचे काम हे जिवाणू करून पिकांना उपलब्ध करून देतात.

) मायकोरायझा:

मायकोरायझा ही पिकांच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढणारी एक उपयुक्त बुरशी आहे. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळासारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्य उपलब्ध होतात. स्फुरद, पलाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, व तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात.

जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती मात्रा :

) बीजप्रक्रिया :

जैविक खतांची बीजप्रक्रिया करताना १० किलो बियाण्यास १०० मिली जैविक खत वापरावे. प्लास्टिकच्या बादलीत १०किलो बियाणे घेऊन त्यात १०० मिली जैविक खतांची मात्रा टाकून हलक्या हाताने सारख्या प्रमाणात बियाण्यास लावावे. त्यानंतर बियाणे थोडा वेळ सावलीत सुकू द्यावे. या प्रकारे एक किंवा जास्त जैविक खतांची प्रकिया बियाण्यवर करता येते. सोयाबीन व भुईमूग या बिजांचा पृष्ठभाग नाजूक असल्याने या पिकांच्या १० किलो बियाण्यास ५० मिली खत वापरावे.

) रोपांची मुळे बुडविणे :

ज्या पिकांची रोपे तयार करून लागवड केली जाते त्या पिकांसाठी १ लिटर जैविक खत १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्ध्या तासासाठी या द्रावणात बुडवून ठेवावेत व नंतर लागवड करावी.

) माती किंवा शेणखत मधे मिसळून देणे :

४०० ते ६०० किलो ओलसर मातीत किंवा शेणखतात १ लिटर जैविक खत मिसळून रात्रभर ठेवावे. पेरणी किंवा जमिनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.

) पिकांच्या मुळांभोवती देणे :

उभ्या पिकास जैविक खत फवारणी पंपाच्या साहाय्याने देता येते. २०० लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळून द्रावण सकाळी किंवा सायंकाळी पिकांच्या मुळांजवळ नोझल काढलेल्या पंपाच्या मदतीने फवारावे.

) ठिंबक सिंचनाद्वारे देणे :

ठिंबक सिंचनाद्वारे जैविक खत देण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी १ लिटर जैविक खत सिंचनमध्ये मिसळून द्यावे. फळपिके, ऊस, कापूस, ई. पिकांना ही पद्धत उपयुक्त आहे.

जैविक खतांचे फायदे :

१) जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकवून ठेवते.

२) पर्यावरणाचा समतोल साधला जातो.

३) उपयुक्त जीवजंतू आणि मित्रकिडींनाही काही धोखा नाही.

४)सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो.

५) नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

६) पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

७) पिकांमध्ये प्रतिजैविकांची वाढ होऊन पिकाची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते.

८) जैविक खतांतील संजिवकांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते व पिकांची चांगली वाढ होते.

९) जैविक खते तुलनेत स्वस्त असल्याने उत्पादन खर्च कमी होतो.

१०) जैविक खतांचे कुठलेही अपायकारक परिणाम जमीन, पाणी, पिक, आणि जैवविविधतेवर आढळून येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *